अहिल्यानगर -कोतवाली पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचार्यासह इतर कर्मचारी व वरीष्ठ अधिकार्यांना फोन करून शिवीगाळ केल्याची व प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांना बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी भाऊसाहेब नारायण शिंदे (रा. चिचोंडी पाटील) याच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यात कामावर असताना तेथील लॅण्डलाईन फोनवर फोन आला. त्याने स्वतःचे नाव भाऊसाहेब शिंदे सांगत संबंधित कर्मचार्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. सदर महिला कर्मचार्याने हा प्रकार सहकारी कर्मचार्यांना सांगितला. त्यानंतर पोलिस ठाण्यातील दुसर्या कर्मचार्याने सदर व्यक्तीला फोन केला असता, त्या कर्मचार्यालाही त्याने शिवीगाळ केली. पोलिस ठाण्यातील इतर अधिकारी व विविध वरीष्ठ पोलिस अधिकारी, राजकीय नेत्यांची नावे घेऊन त्याने शिवीगाळ केली. प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांना बॉम्बस्फोट करून उडवून देईल, अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, शिंदे याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवला. सदर व्यक्तीने यापूर्वीही जिल्ह्यातील इतर काही पोलिस ठाण्यात, वरीष्ठ अधिकार्यांना अशाच पद्धतीने फोन करून शिवीगाळ केली होती. संबंधित व्यक्तीविरोधात यापूर्वी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. तसेच, तो मुंबईत नोकरीला होता व एका चौकशी प्रकरणात त्याची नोकरी गेली. तेव्हापासून तो पोलिस खात्याविरोधात असलेल्या रागातून असे कृत्य करत असल्याचे सांगण्यात आले. त्याला नोटीस बजावून तूर्तास सोडण्यात आले आहे.