विधानसभा निवडणुकीत राहुरी-नगर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नेते, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा दारुण पराभव केला. कृषि उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत एकहाती मिळविले वर्चस्व. केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता आल्याने जिल्ह्यासह नगर तालुक्यात भाजपाची ताकद वाढली आहे. आगामी तीन महिन्यात होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तालुक्यातील सर्वच गट-गणांबाबत नियोजन सुरु केले असून पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी तयारी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे.
सन 2006-2007 च्या काळात तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांना विरोध म्हणून काँग्रेसचे माजी खासदार स्व. दादापाटील शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी एकत्रित नगर तालुक्यात महाविकास आघाडीची मोट बांधली. 2007 च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नगर तालुका महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. कर्डिलेंच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीवर पहिल्यांदा भगवा फडकला. 2012 मध्ये नगर तालुका मविआमध्ये फूट पडली.
शिवसेना-भाजपा विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी लढत झाली. या लढतीत पंचायत समितीवर शिवसेना-भाजपाची सत्ता आली. 2016 मधील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची पुन्हा नगर तालुका मविआची एकजूट झाली. पंचायत समितीच्या 12 पैकी 8 जागा जिंकत पंचायत समितीवर पुन्हा झेंडा फडकविला. तर जिल्हा परिषदेच्या सहा पैकी पाच जागा जिंकल्या. एका जागी माधवराव लामखडे विजयी झाले. लोकसभा निवडणुकी अगोदर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत नगर तालुका मविआला पराभवाला सामोरे जावे लागले.
जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांची मुदत 21 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली असून तेव्हापासून आजतागायत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकराज आहे. दरम्यान, प्रशासनाने निवडणुकीची तयारीही केली, त्यासाठी आरक्षण, गट-गण रचना करण्यात आली परंतु ओबीसी आरक्षणाचा व गट-रचनेबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने याचिका न्यायप्रविष्ठ आहेत. त्यावर अंतिम सुनावणी 22 जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केल्याने आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी तयारी सुरु केली आहे.