नगर अर्बन मल्टीस्टेट सहकारी बँकेच्या कर्ज गैरव्यवहार व घोटाळ्यातील गुन्ह्यात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका कर्जदाराला अटक केली. अक्षय राजेंद्र लुणावत (३४, रा. उंड्री, पुणे) असे या कर्जदाराचे नाव आहे. उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने पुण्यातील राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने, मंगळवारी त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. लुणावत याच्या खात्यातून बँकेचा संचालक व फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या खात्यात रकमा वर्ग करण्यात आल्या आहेत.
अक्षय लुणावत हा कल्पद्रुमा ज्वेलर्सचा संचालक असून त्याच्या नावावर ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. त्याने बँकेचे अधिकारी, पदाधिकारी व संचालक यांच्याशी संगनमत करून कल्पद्रुमा ज्वेल्स अॅण्ड जेम्स या कंपनीच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण मालमत्तेचे वाढीव मूल्यांकन दर्शवून वेळोवेळी मोठ्या रकमांचे कर्ज घेतले. या कर्ज रकमेचा गैरवापर केला व कर्ज रकमेची परतफेड केलेली नाही. या कर्ज रकमेच्या वापराबाबत तपास करून रक्कम हस्तगत करायची आहे.
लुणावत याने सन २०१५ मध्ये घेतलेल्या ६ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नगर अर्बन बँकेचे कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजी या फर्मच्या नावाने मंजूर कर्जाची रक्कम वापरण्यात आली आहे. टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीच्या खात्यातून ३ कोटी ५ लाख रुपये माउली ट्रेडर्स यांच्या मर्चंट्स बँकेतील खात्यात वर्ग केली व तेथून रोख स्वरूपात काढून ती रक्कम नगर अर्बन बँकेत जमा करून त्याद्वारे त्याचे कर्ज निरंक केल्याचे दर्शवलेले आहे. तसेच, लुणावत याच्या खात्यातून नगर अर्बन बँकेचे संचालक नवनीत सुरपुरीया, डॉ. नीलेश शेळके व इतरांच्या खात्यावर वेळोवेळी रकमा वर्ग करण्यात आल्या आहेत.
या रकमा बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या कर्जापोटी त्याने संचालकांना दिल्या असण्याची शक्यता आहे. याचा तपास करण्यासाठी सात दिवस पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली. न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.