राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनात अनेक विषयावर चर्चा होणार आहे.
अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे.
हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अजितदादा गटाच्या आमदारांना व्हीप काढला जाणार आहे का?, असा सवाल अनिल देशमुख यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी मोठं विधान केलं आहे. मागच्या अधिवेशनावेळी अजितदादा गटाचे आमदार कामकाजात सहभागी झाले नाहीत. केवळ लॉबीत फिरत होते. त्यामुळे त्यांना शरद पवार यांच्याकडे जाण्यात रस आहे हे स्पष्ट होते. पुढच्या काळात या सर्वांची घर वापसी बघायला मिळेल, असं सांगतानाच या अधिवेशनात व्हीप काढायचीच वेळ आली तर तो नक्की काढू. काही अडचण नाही, असं सूचक विधान अनिल देशमुख यांनी केलं आहे.
अजितदादा गटाचे आमदार द्विधा मनस्थितीत असल्याचा दावाही अनिल देशमुख यांनी केला. अजित पवार गटाचे आमदार द्विधा मनस्थितीत आहेत. या सरकारकडून आपल्या मतदारसंघातील जेवढी शक्य असेल तेवढी कामे काढून घ्यायची आणि नंतर परत शरद पवारांकडे यायचे असा विचार करत आहेत. खूप मोठ्या संख्येत आमदार घर वापसी करतील, असा दावा देशमुख यांनी केला आहे.