मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर मराठा समाजाच्या जुन्या कुणबी नोंदी असल्याचा विषय समोर आला. संपूर्ण राज्यात कुणबी नोंदी शोधण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत भाषण करतानाच सांगितले की, मी कुणबी दाखला घेणार नाही. हाच प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका शब्दात उत्तर देऊन विषय संपविला. तर एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका मांडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री हा सर्व समाजाचा असतो. माझ्याकडे जो दाखला आहे, त्यावर मराठा लिहिलेले आहे. मी शेती करत असलो तरी कुणबी दाखला घेणार नाही.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर ‘नाही…’ असे थेट उत्तर देऊन कुणबी दाखला घेणार नसल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, सरकार म्हणून आम्हाला एक भूमिका स्पष्ट करायची आहे की, आम्हाला कुणबी दाखला मिळण्याऐवजी गरीब मराठ्याच्या कुटुंबांना कुणबी दाखला मिळणे गरजेचे आहे.