आमदार बच्चू कडू हे नेहमीच त्यांच्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत असतात. कधी ते सत्ताधारी पक्षावर तुटून पडतात तर कधी विरोधकांवरही हल्लाबोल करतात. पण याच कडूंना शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिपद मिळेल अशी आशा खुद्द त्यांच्यासह सर्वांनाच होती. पण त्यावेळी हुलकावणी दिलेले मंत्रिपद मिळालेच नाही. सरतेशेवटी शिंदे- फडणवीस- पवार सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचे संकेत देतानाच त्यांनी मंत्रिपदाची आशाही सोडली.
पण याच बच्चू कडूंनी आता थेट मुख्यमंत्रिपदावरच दावा केला आहे.प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी विधानभवन परिसरात मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी 2024 ला मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटलं आहे.
कडू म्हणाले, माझे 2024 ला जर माझ्या पक्षाचे 7 ते 8 आमदार निवडून आल्यास मीदेखील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. कारण यापूर्वी अवघे 8 खासदार असलेले एच. डी. देवेगौडा देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यामुळे मी पण निश्चितच मुख्यमंत्री होऊ शकतो.