राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी या सगळ्यावर प्रतिक्रिया देईन, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात लिहेलेल पत्र मला मिळाले, ते मी वाचलं. नवाब मलिक हे काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. ते सभागृहात कुठे बसले, याबाबत मीडियाने माहिती दिली. पण आम्ही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर नवाब मलिक हे पहिल्यांदाच सभागृहात आले होते. त्यांची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतरच मी त्यांच्याबद्दल माझं मत देईन. नवाब मलिक कोणासोबत आहेत, हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच मी बोलेन. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राबाबत काय करायचं ते मी करेन. त्याबाबत मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.