राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर दबाव आणला होता, असा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांनी केला आहे.तीन वर्षांपूर्वी माझ्या शासकीय निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी एका माणसाला पाठवलं होतं. हा माणूस फडणवीसांचा खास होता. त्यांनी मला एक लिफाफा दिला. त्यात चार मुद्दे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते अनिल परब यांची नावं त्यात होती. या चारही नेत्यांविरोधात प्रतिज्ञापत्र द्या. त्यामध्ये त्यांच्यावर आरोप करा, अशी ऑफर मला देण्यात आली होती. पण मी खोटे आरोप करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला, असा खळबळजनक आरोप देशमुखांनी केला.महापालिका निवडणुकीसाठी मला पैसे जमवण्यास सांगितले असा आरोप उद्धव ठाकरेंवर करा. आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि तिला बाल्कनीतून ढकललं असा आरोप करा. अजित पवारांवर गुटख्याच्या बाबतीत खोटे आरोप करा. अनिल परबांवर खोटे आरोप करा, असं सांगण्यात आलं. त्यासाठी दबाव टाकण्यात आला, असं देशमुख म्हणाले. मी पुराव्यांशिवाय बोलत नाही. योग्यवेळी पुरावे समोर आणेन. फडणवीसांनी पाठवलेल्या त्या व्यक्तीचंही नाव सांगेन, असं देशमुख म्हणाले.
ठाकरे पिता पुत्र, अजित पवारांवर खोटे आरोप करण्यासाठी दबाव, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट, थेट फडणवीसांकडे बोट
- Advertisement -