नागपूरजवळील बाजारगाव येथे असलेल्या सोलर एक्सप्लॉसिव्ह कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात ९ जण ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारुगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात मोठी जीवितहानी झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असून आतमध्ये पोहोचून स्थिती स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिली. मृतांमध्ये ६ पुरुष तर ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर एक्सवरून दिली.