नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अखेरच्या राजकीय वातावरण तापलं. अधिवेशनाचा शेवटचा दिवस सत्ताधारी व विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप व खडाजंगीनं गाजला. विरोधकांनी केलेल्या आरोपांना शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत त्यासंदर्भात आकडेवारी सादर केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही एकनाथ शिंदे यांनी टोलेबाजी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद आपल्याला मिळू नये यासाठी राजकारण झालं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. “तेव्हा मी उपसमितीचा अध्यक्ष होऊ नये म्हणूनही पडद्याआडून प्रयत्न झाले. मी मराठा समाजासाठी काम करेन ही भीती तेव्हा अडीच वर्षांच्या मुख्यमंत्र्यांना आणि अशोक चव्हाणांना होती. मी तेव्हाही म्हटलं अशोक चव्हाण अध्यक्ष होतायत, तर होऊ द्या. जे काही साटंलोटं केलं, डावललं हा विषय झालागेला गंगेला मिळाला”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केली.
आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं अक्षरश: टेंडरचा पाऊस पाडला. या प्रकरणातील एक महत्त्वाचं प्यादं हा रोमिन छेडा आहे. या कंपनीच्या सुरस कथांची सुरुवात जिजामाता उद्यानातील पेंग्विनपासून झाली. हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पेंग्विनसाठीचं बांधकाम करण्याचं कंत्राट दिलं. रोमिन छेडाला तब्बल ५७ कंत्राटं देण्यात आली. रोमिनला पेंग्विनपाठोपाठ कोविडच्या कठीण काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं. कोण आहे हा? कशासाठी दिलं? गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्यांचं दुकान होतं. कंत्राट मिळताच दोन टक्के पैसे ठेवून बाकीचे सगळे पैसे रोमिन छेडाच्या खात्यात वळवण्यात आले. पैशांच्या खेळांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा?” असा धक्कादायक आरोप एकनाथ शिंदेंनी केला.