लोकसभा निवडणूक दरम्यान पक्षाचे काम न करता पक्षाच्या विरोधात काम केल्याप्रकरणी नांदेडच्या अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह दहा नगरसेवकांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अर्धापुरमध्ये खळबळ उडाली आहे काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अर्धापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसह दहा जणांनी पक्ष विरोधी काम केले. माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यासोबत हे काँग्रेसचे दहा नगरसेवक भाजपचे काम करीत आहेत. अनेक वेळा या नगरसेवकांना काँग्रेस पक्षाकडून समज देण्यात आली होती. परंतु या नगरसेवकांनी पक्ष विरोधी काम करणे सोडले नाही. ते भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसून येत होते.
दरम्यान नांदेड काँग्रेस कमिटीने या १० नागरसेवकांचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात आला होते. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या दहा नगरसेवकांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले. पटोले यांच्या आदेशानुसार नांदेड काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी अर्धापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह एकूण १० नगरसेवकांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली.