नांदेडचे खासदार, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचे दुःखद निधन झाले आहे. मध्यरात्री वसंत चव्हाण यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना तातडीने हैद्राबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वसंत चव्हाण यांच्या निधनच्या बातमीने राजकीय वर्तुळासह नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंत चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने नांदेडमधून उमेदवारी दिली होती. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतरही वसंत चव्हाण हे काँग्रेससोबत कायम होते. इतकेच नव्हेतर त्यांनी नांदेडमध्ये लोकसभेला सर्वांनाच धक्का देत विजय खेचून आणला होता.