नांदेड: महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार आमच्याबरोबर राजकारण करत आहे. आमच्या हक्काचं आरक्षण द्यायला टाळाटाळ करत आहे”, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली. जरांगे यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये मराठा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला हजारो समाजबांधव उपस्थित होते.
जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना वाटतंय की मी मराठ्यांच्या काही नेत्यांना मोठं करेन, जातीकडे दुर्लक्ष करेन आणि कोणी काही बोलणार नाही. परंतु, त्यांना एक गोष्ट समजत नाहीये की समाजबांधव आता त्यांचं ऐकणार नाहीत. मराठ्यांनी त्यांना आता सांगितलंय तुम्ही नेत्यांना मोठं करा आणि त्यांनाच घेऊन फिरा, आम्ही तुम्हाला योग्य वेळी उत्तर देऊ. मी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा सांगू इच्छितो, तुम्ही आमचे शत्रू नाही, आम्हाला केवळ आमच्या हक्काचं आरक्षण द्या.
मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले, तुमचे ते गिरीश महाजन, छगन भुजबळ चंद्रकांत पाटील, या लोकांना आरक्षणातलं काहीच कळत नाही. मराठ्यांची दोन-चार माकडं तुमच्याबरोबर असतात, ते मंत्रिपदासाठी तुमचं ऐकतात. मराठ्यांचं काहीही होऊ देत त्यांना काही फरक पडत नाही. तुमची ती चार माकडं मला सांगतात, आमच्या साहेबांना काही बोलायचं नाही. मी जे काय बोलतोय ते ऐकत असाल तर ऐका, मराठा समाजात सरकारविरोधात रोष पसरू लागला आहे. तुमचे चार लोक तुमच्या बाजूने बोलतात, कारण त्यांना निवडणुकीचं तिकीट पाहिजे, मंत्रिपद पाहिजे. मला तिकीट, मंत्रिपद, पैसे यातलं काहीच नको. मला केवळ माझ्या जातीला आरक्षण मिळवून द्यायचं आहे म्हणून मी त्यांच्या विरोधात आहे.