राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांना प्रतिआव्हान दिले आहे. मनोज जरांगे पाटलांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करून दाखवावेत आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, असे ओपन चॅलेंज भुजबळांनी दिले आहे.
भुजबळ म्हणाले की, आता मनोज जरांगे मुस्लिमांनाही आरक्षण द्या, असे म्हणत आहेत. मात्र मुस्लीम समाजाला राज्यात 25 वर्षापूर्वी आरक्षण देण्यात आले आहे. इकडे माळी समाज, तिकडे बागवान, इकडे खाटीक तिकडे कुरेशी, इकडे कासार तिकडे मण्यार, असे मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. मात्र अर्धवट माहिती असणारे लोक असे बोलतात. ते मध्येच बोलतात की, मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार, मी हे करणार वैगेरे. तू एकच काम कर, 288 जागा लढव, असे आव्हान त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती मनोज जरांगे पाटलांना दिले.
मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना निवडणुकीत पाडू, असे वक्तव्य केले होते. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरागेंनी मला पाडण्यापेक्षा माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी. मला निवडणुकीत पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही. मला मागच्या पाच दशकांपासून संघर्ष करायची सवय आहे. रस्त्यावर लढण्याची आणि सरकारमध्ये राहून काम करण्याची माझी तयारी आहे. येवला मतदारसंघात कुणीही येवो, पण मी लाखभर मतांनी निवडून येणार आहे.