आगामी विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटाला 80 ते 90 जागा मिळाल्या पाहिजेत. महायुतीमध्ये सामील होताना आम्हाला तसा शब्द देण्यात आला होता, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन बराच गदारोळ झाला होता. भुजबळांच्या या मागणीमुळे भाजपचे नेते बरेच दुखावले गेले होते. भुजबळांना आवरा, असेही भाजपच्या नेत्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आता मनुस्मृती आणि त्यापाठोपाठ जागावाटपाच्या मुद्द्यावरुन टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच, असे भुजबळांनी खमकेपणाने भाजप नेत्यांना सुनावले आहे. ते शुक्रवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
भुजबळ यांनी म्हटले की, मी जागावाटपाचा मुद्दा माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडला होता. पण त्याचेही लोकांना वाईट वाटले. भुजबळ असं कसं बोलू शकतात, अशी ओरड त्यांनी केली. त्यामुळे मी आता प्रसारमाध्यमांसमोर बोलणार नाही. मला जे काही सांगायचं असतं, ते मी पक्षाला सांगेन. आम्ही महायुतीमध्ये येताना ते काय बोलले होते, त्याची आठवण फक्त मी त्यांना करुन दिली. पण त्यावरुन तुम्ही चर्चा करता, चॅनलमध्ये बोलता, भुजबळांना समज द्या, असे बोलले जाते.
तुम्ही तुमच्या पक्षात बोलता तेव्हा आम्ही कुठे काय म्हणतो? तुमच्या पक्षात काय बोलावे हा तुमचा अधिकार आहे. तसेच मी माझ्या पक्षात काय बोलावे हा माझा अधिकार आहे. हा अधिकार सर्वांनी मान्य केला पाहिजे. शेवटी निर्णय चर्चेतून होणार, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.