नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीस सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नाशिक शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीसाठी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विवेक कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी बंडखोरी केलेली नाही. मुळात ज्या मतदारसंघाची निवडणूक आहे तो शिक्षकांशी निगडित मतदारसंघ असल्याने इथे राजकीय जोडे बाजूला ठेवून या उमेदवारीकडे बघितले पाहिजे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळे पक्ष मिळून प्रयत्न केले पाहिजे. शिक्षक हा देश घडवणारा महत्त्वाचा घटक आहे, असे त्यांनी म्हटले.
शिक्षकांचे प्रश्न सुटणे येथे महत्वाचे असून सर्वच पक्षांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत असे ते म्हणाले. पक्ष विरहित उमेदवारी करावी असा शिक्षकांचा आग्रह असल्याने मी अपक्ष लढण्याचे ठरवले आहे. तसेच अपक्ष उमेदवारी करतो त्यावेळी कुठल्याही पक्षाकडे पाठिंबा मागण्याचा प्रश्न येत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.