खासदार संजय राऊत यांनी १३ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक महापालिकेत झालेल्या ८०० कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी पत्र पाठवले आहे . तसंच हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवलंय. “विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नाशिक महापालिकेमार्फत खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचे अर्थात जमिनी ताब्यात घेऊन विकत घेण्याचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यात नाशिक शहरातील ठराविक बिल्डरांचे आर्थिक हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनाच सातशे कोटी रुपये जमिनींचा मोबदला म्हणून वाटप करून मोठा घोटाळा करण्यात आला. यामुळेच मुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी टाळून संबंधित बिल्डरांना पाठीशी घालत आहेत”, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
घोटाळ्याचा सविस्तर अहवाल व पुरावे फाईलमध्ये जोडले आहेत. या संपूर्ण घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच एसआयटी, ईडी, सीबीआय, एसीबीमार्फतही चौकशी व्हावी. नजराणा, आयकर, मुद्रांक शुल्क वसूल करण्यासाठी संबंधित खात्यांना निर्देशित करावे, सर्व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ही विनंती.
हेच पत्र संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवले आहे. तसंत, सीबीआय, आयकर विभाग, ईडी आणि भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेलाही या पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे.