माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर दराडे आणि त्यांचे पुतणे कुणाल दराडे आणि जयंत पाटील यांच्यात वीस मिनिटं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. कुणाल दराडे आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सूत्रांची माहिती आहे. याआधी देखील एकदा दराडे कुटुंबीयांनी जयंत पाटील यांची भेट घेतली होती. आता, ऐन निवडणुकांच्या तोंडावर भेट घेतल्याने येवला मतदारसंघातून त्यांची महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सध्या येवला विधानसभेची जागा आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडी ही विद्यमान जागा असणार आहे. तर, महाविकास आघाडी देखील ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात जाईल. त्यामुळे, राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात कोण असेल, छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार कोण असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच, आज कुणाल दराडे यांनी भेट घेतल्याने दराडे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगणार असल्याचे दिसून येते.