Monday, July 22, 2024

नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी; ‘हे’ उमेदवार रिंगणात

लोकसभेनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते या निवडणुकीत गुंतल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात लोकसभेप्रमाणेच विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील प्रत्येक पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे विधान परीषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची चुरस वाढतांना दिसत आहे.

त्यातच आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने मविआतील नेते एकमेकांशी चर्चा करून आपले उमेदवार मागे घेत आहेत. तर महायुतीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा समन्वयाचा अभाव दिसत नसल्याचे समोर येत असून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठिकठिकाणी बंडखोरी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शिक्षक मतदारसंघात देखील महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसून आले आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघातून महायुती पुरस्कृत उमेदवार व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी प्राधिकृत प्रतिनिधी पाठवून अखेरच्या क्षणी माघार घेतली आहे. तर दुसरे महायुती पुरस्कृत उमेदवार धनराज विसपुते यांनीही नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र,असे असले तरी महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर भिकाजी दराडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अॅड. महेंद्र भावसार व भाजपचे पदाधिकारी विवेक कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुीकत माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी १५ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे या निवडणुकीत आता २१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. याआधी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यात काल ४ जणांनी तर आज ११ उमेदवारांनी माघार घेतली. दरम्यान ३१ मे ते ७ जून,२०२४ या कालावधीत ३८ उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते. त्यापैकी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध व दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. त्यात १५ उमेदवारांनी माघार घेतली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles