नाशिक: साने गुरुजी ज्या भागात शिक्षक होते त्याच नाशिक शिक्षक मतदारसंघात आज महिलांना नथ तर पुरुष मतदारांना मतदानासाठी किंमती वस्त्र देण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असल्याचा दावा शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने तात्काळ याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणीही कुलकर्णी यांनी केली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघात 26 जूनला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने शिक्षकांना पैसे वाटपाचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सहा वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांना पैठणी वाटली गेली होती. एका ठिकाणी काही ध्येयवादी शिक्षकांनी ती पैठणी जाळून निषेध सुद्धा व्यक्त केला होता. त्यावेळी सुद्धा हेरंब कुलकर्णी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पण सहा वर्षानंतर पुन्हा तेच घडते आहे. काही उमेदवार पुन्हा शिक्षकांना वस्तू वाटप करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
https://www.facebook.com/share/p/DXRviTsfsFabKYqn/?mibextid=oFDknk