नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली होती. परंतु निवडणूक आयोगाने ती पुढे ढकलली. कोपरगावचे विद्यामान आमदार आशुतोष काळे सत्ताधारी अजितदादा गटात सहभागी झाल्याने कोपरगाव विधानसभा मतदारसंघावर काळे व कोल्हे या दोघांकडूनही दावा ठोकला जात होता. त्यातून भाजपमध्ये वादंगही निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने कोपरगावचा तिढा सुटल्याचे मानले जाते.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे अकोल्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी राजूर येथे येऊन माजीमंत्री पिचड यांची भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद मागितले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतानाच थोड्या राजकीय गप्पाही रंगल्या. देशाचे, राज्याचे प्रश्न, कौटुंबिक विचारपूस करत त्यांनी नगर जिल्ह्याला प्रथमच संधी प्राप्त झाल्याने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विवेक इच्छुक असून आपण त्यांना आपले आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती केली. त्यावर पिचड यांनी त्यांना शुभेच्छा देत मदतीचे आश्वासन दिले.