शरद पवार यांच्यापासून फारकत घेत राष्ट्रवादीतील आमदारांचा मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेत सामील झाला होता. सत्तेत सामील झाल्या दिवसापासून अजित पवार यांच्याकडून त्यांच्या गटातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शक्य त्या मार्गाने बळ दिले जात आहे.आता अजित पवार गटाकडून आपले जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना एक महागडी भेट दिली जाणार आहे. अजित पवार गटाकडून या सगळ्यांना महागड्या गाड्या देण्यात येणार आहेत. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार देण्याची घोषणा केली होती. जेणेकरुन आपापल्या भागात फिरण्यासाठी आणि पक्षाच्या प्रचारासाठी त्यांना या गाडीचा वापर करता येईल. ही घोषणा आता प्रत्यक्षात अंमलात येणार असून अजित पवार यांच्या गटाकडून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची टेस्टिंग सुरु आहे. अजित पवार गटाच्या मंत्रालयासमोर असलेल्या पक्षकार्यालयात काही गाड्या टेस्ट ड्राईव्हसाठी आणण्यात आल्या होत्या.