उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवाब मलिक यांच्या विषयीचे पत्र प्रसारमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावरून मलिक यांच्याबाबत मत व्यक्त केले. ‘नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्दय़ावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. विधानसभेत जुन्या सहकाऱ्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे,’ असे तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले.