राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नवीन बदल सुरू केले आहेत. पक्षाचे प्रतिमावर्धन करण्याची जोरदार तयारी चालवली आहे. त्याचाच भाग म्हणून विधानसभा निवडणुकीची प्रचार व प्रसिद्धीची रणनीती आखण्याचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. गुलाबी रंग ही पक्षाची खास ओळख ठसवण्यात येणार असून पक्षाचे सभा, कार्यक्रम यांमध्ये सर्वत्र गुलाबी रंग प्राधान्याने वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे स्वत: अजित पवार यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट वापरण्यास सुरुवात केली आहे.
पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळ आणि तिरंगी झेंडा यात बदल होणार नाही. मात्र पक्षाचा अधिकृत रंग यापुढे गुलाबी असणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून पक्षाचे फलक, जाहिराती यावर गुलाबी रंगाला प्राधान्य देण्यात येत आहे. अजित पवार यापुढे पांढऱ्या कुर्त्यावर केवळ गुलाबी जॅकेट परिधान करणार आहेत. त्यासाठी डझनभर जॅकेट खास शिवून घेतली आहेत. जाहीर कार्यक्रमात अजित पवार यापुढे गुलाबी रंगाचा मफलर वापरतील. कंपनीच्या सूचनेप्रमाणे अजित पवार यांनी छातीवर घड्याळ हे राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह लावण्यास प्रारंभ केला आहे.