रविवारी (२ जून) अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर त्यांच्याबरोबर ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुळात भाजपा-शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे वेगवेगळ्या विचारांचे पक्ष असल्याने या युतीत त्यांच्यात मतभेद होतील, तणाव निर्माण होईल अशी शक्यता आतापासूनच वर्तवली जात आहे. अशातच यावर आता आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं आहे.
मिटकरी म्हणाले, प्रत्येक पक्षाची वेगवेगळी मतं असू शकतात. तो त्या-त्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही सेक्युलर आहे. आमची शिव-शाहू-आंबेडकरवादी भूमिका आहे. आमची तत्वं आमच्याजवळ, भाजपाने भाजपाची तत्वं पाळावी. यावेळी मिटकरी यांना भाजपाच्या हिंदुत्ववादी भूमिकांविषयी विचारल्यावर अमोल मिटकरी म्हणाले, मी ही हिंदू आहे. मी ही हिंदुत्ववादीच आहे. परंतु ते (भाजपा) सांगतील ते हिंदुत्व कसं? असा प्रश्नही मिटकरी यांनी यावेळी उपस्थित केला.
आम्ही सत्तेकरता सोबत आहोत. समजा आमची युती आहे. परंतु एखादं मॉब लिंचिंग करणे, एखाद्या समाजाविरोधात काहीतरी बोलणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नसेल. त्यांच्या भूमिका त्यांना लखलाभ.