उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर आ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘राष्ट्रवादी कुणाची हे सुप्रीम कोर्टात बाकी आहे. कोणाला विचारून आंदोलन जितेंद्र आव्हाडने केलं नाही आणि करणारही नाही. राज्यात कुणालाही विचारलं तर कुणीही सांगेल खरी राष्ट्रवादी शरद पवारांची आहे. माझं आंदोलन शरद पवारही अडवू शकत नाहीत किंवा रोखू शकत नाहीत. जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मी परत कधी त्यांना भेटलो नाही,’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘बोलताना मर्यादा बाळगा, अजित पवारांनी शरद पवारांवर बोलावं हे कलयुग आहे. ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्यावर बोलता. यांना हा पक्ष दावणीला लावायचा होता, दुसऱ्या पक्षात विलीन करायचा होता, शरद पवार त्यांना अडसर ठरत होते. तुम्ही कुणीही झालात तरी तुमचा निर्माता शरद पवारच हे अख्ख्या जगाला माहिती आहे,’ असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
शरद पवार यांचा राजीनामा तुम्हाला का हवा होता? ते जर बारामतीमधून निवडणूक लढवणार असतील तर यात गाजावाजा करायची गरज काय? तुमचं प्लानिंग कधीपासून होतं, हे स्वत: विचार करा. 5 वर्ष पवार साहेबांचं डोकं कुणी खाल्लं? भाजपसोबत चला हे कोण सांगायचं? शरद पवारांचा राजकीय प्रवास धुळीत मिळवून आपण सत्तेत यायचं हे यांना हवं होतं,’ असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
‘शरद पवारांबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत, मी कुणाशी चर्चा केली नाही, ना कुणाला भेटलो. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही. तुम्ही शरद पवारांना घाबरवायला जाता, बस करा हे बालीश राजकारण,’ अशी घणाघाती टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केली. दरम्यान धनंजय मुंडेंच्या भाषणावरही आव्हाडांनी टीका केली, काकाच्या पाठीत सुरा कुणी भोसकला? स्वत:च्या ताईला त्रास दिला, असा आरोप आव्हाडांनी धनंजय मुंडेंवर केला.