विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फारसे सार्वजनिक मंचावर न दिसलेले शरद पवार आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. तसेच उद्या मारकडवाडी येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. “निवडणुकीत यश मिळाल्यानंतर एक उत्साहाचे वातावरण असते. पण मला महाराष्ट्रात तसे वातावरण दिसत नाही. पण मी उगीचच आरोप करणार नाही. कारण माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. आम्ही फक्त मतदानाची आकडेवारी गोळा केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला एकंदर किती मते मिळाली आणि त्यांचे किती लोक निवडून आले”, असे सांगून शरद पवारांनी विधानसभेच्या निकालाचे विश्लेषण केले.
शरद पवार पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडली आणि त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही काँग्रेसपेक्षा ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते ७२ लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त १० आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५८ लाख मतदान मिळाले, पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत.”
म्हणून मी मारकडवाडीत जातोय
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडीतील लोक मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी ग्रामस्थ इच्छुक आहेत. पण प्रशासनाने त्यास विरोध दर्शविला. “प्रचारावेळी निवडणुकीची सभा बघूनच कोणता उमेदवार जिंकणार हे कळते. कोल्हापूरमध्येही आमच्या उमेदवारांच्या सभा जोरदार झाल्या. पण त्यांचा पराभव झाला. राज्यात मुख्य निवडणूक प्रक्रिया होऊन गेली आहे. त्यामुळे एखाद्या गावाने जर त्यांच्या पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यावर बंदी कशासाठी आणि कोणत्या कायद्याद्वारे? १४४ सारखे कलम लावण्याची गरजच काय? त्यामुळे गावातल्या लोकांचे नेमके म्हणणे काय आहे, यासाठी मी मारकडवाडीत जाणार आहे”, असे शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत सांगितले.