नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला असून जागावाटपाचा तिढा अजूनही न सुटल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं आज जाहीर केलं आहे. “नाशिकच्या जागेबाबत मला पक्षनेतृत्वाकडून सांगून ३ आठवडे उलटून गेले आहेत. मात्र अजूनही या जागेचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे, समोरच्या पक्षाचा उमेदवार जाहीर होऊन बरेच दिवस झाले आणि ते जोरदारपणे कामालाही लागले आहेत. परिणामी महायुतीला नाशिकच्या जागेवर अडचण निर्माण होऊ शकते. हा डेडलॉक तोडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती आज पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः माझे नाव सुचविले होते. पण महायुतीमध्ये धुसफुस वाढल्यामुळे या मतदारसंघाचा निर्णय होत नव्हता, त्यामुळे मी माघार घेत आहे, असे छगन भुजबळ यांनी जाहीर केले.