राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात पारनेरचे आमदार नीलेश लंके प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. आमदार लंके यांची राजकीय हालचाली देखील तसे संकेत देत आहेत. परंतु शरद पवार आणि आमदार लंके हे समोरासमोर येऊन देखील राजकीय खेळ ताणून धरत आहेत.
आमदार लंकेंच्या या हालचालींमुळे अजितदादांनी देखील त्यांना चांगलेच फटकारले आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील महायुतीचा धर्म पाळत आम्ही भाजप उमेदवाराचे काम करणार असल्याचे सांगून आमदार लंकेंच्या परतीचे दोर कापले आहेत. आता आमदार अमोल मिटकरी यांनी देखील आमदार नीलेश लंके यांना खोचक टोमणा लगावला आहे.
आमदार मिटकरी यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर या सर्व घडामोडीवर खोचक टोमणा मारणारी पोस्ट शेअर केली आहे. ‘गेल्या आठ महिन्यात पारनेर विधानसभा मतदारसंघात विकास कामांसाठी ६३७ कोटी रुपये आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक हजार कोटी रुपये अजितदादांकडून घेऊन गेलेले आमदार नीलेश लंके साहेबांचा तुतारी गटाने करेक्ट कार्यक्रम केला’, अशी पोस्ट शेअर केली. तसेच पोस्ट खाली हॅशटॅग म्हणून ‘दिल्या खरी सुखी राहा’, असे म्हटले आहे.