Thursday, September 19, 2024

अजित पवार गटाच्या आमदाराचं मोठं विधान ,म्हणाले अजित पवारांबरोबर नाईलाजाने जावं लागलं

विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक तोंडावर आल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. सध्या नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून विविध मतदारसंघात सभा, मेळावे आणि आढावा बैठका घेतल्या जात आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच राजकारण सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलेलं आहे.

अशातच काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांकडून एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचा दावाही केला आहे. असं असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी मोठं विधान केलं आहे. “मी अजित पवार यांच्याबरोबर नाईलाजाने गेलो”, असं राजेंद्र शिंगणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. याचवेळी राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांचंही तोंडभरुन कौतुक करत आजही मी शरद पवारांना नेता मानतो, असंही म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

गेली अनेक वर्षे मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये देखील शरद पवार यांचा मोठा मोलाचा वाटा असल्याचंही मी मान्य करतो. त्यामुळे मी आयुष्यभर निश्चितपणे त्यांचा ऋणी राहणार आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात आमच्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्याबरोबर गेलो. त्यानंतर आज राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटी रुपये दिले. परंतु निश्चितपणे शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहतील”, असं आमदार राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.

आमदार शिंगणे पुढे म्हणाले की, “मी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सहभागी झालो असलो तरी गेल्या दोन ते अडीच वर्षांत शरद पवार यांच्याबरोबरील संबंध तोडले असा काही भाग नाही. आजही मी शरद पवार यांना नेता मानतो. गेल्या दोन वर्षांत जाहीर भाषणात असेल किंवा वैयक्तिक बोलतानाही शरद पवार यांचं नाव मी राज्यातील मोठे नेते आणि लोकनेते असंच घेत आलो. भविष्यात देखील शरद पवार यांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासकच राहणार आहे”, असंही राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles