नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे मोठा फटका बसल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पिपाणीचा धोका टाळण्यासाठी शरद पवार गटाने निवडणूक आयोगात धाव घेतली असून पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावं अशी शरद पवार पक्षाची मागणी आहे.
लोकसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत तुतारी घेऊन मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणीमुळे मोठा फटका बसला. तुतारी अन् पिपाणी चिन्ह सारखी असल्यामुळे शरद पवार यांच्या उमेदवारांना मोठा फटका बसला. तसेच राष्ट्रवादीची सातारा लोकसभेची सीटही चिन्हाच्या घोळामुळे गमवावी लागली, यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पिपाणीविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.
पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावं अशा मागणीचे पत्र निवडणूक आयोगाला लिहले आहे. पिपाणी चिन्हांमुळे लोकसभेत शरद पवार गटाला काही प्रमाणात फटका बसल्यानंतर शरद पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे ही विनंती करण्यात आली असून निवडणूक आयोगाने योग्य निर्णय न घेतल्यास शरद पवार पक्ष सुप्रीम कोर्टात जाणार आहे.दरम्यान, सातारा लोकसभेत पिपाणीच्या चिन्हाचा घोळ झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत पाटील यांचा निसटता पराभव झाला. याठिकाणी पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला तब्बल ३७ हजार मते मिळाली. तसेच दिंडोरीमध्येही पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल १ लाख मते मिळाली होती.