१८ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून आता सत्तास्थापनेचा दावा करण्याकरता एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात चढाओढ दिसतेय. एनडीएने बहुमाताचा आकडा गाठला असून इंडिया आघाडीकडूनही सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याकरता जुन्या मित्र पक्षांना बरोबर घेण्याकरता जोर बैठका सुरू झाल्या आहेत. दरम्यान, एनडीएची बैठक संपली असून ते आजच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी आज एनडीएच्या घटकपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला टीडीपीचे अध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडू, जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चिराग पासवान उपस्थित होते. बैठक संपली असून एनडीएचं शिष्टमंडळ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत, असं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीएने सत्तास्थापनेची तयारी पूर्ण केली आहे. या बैठकीत सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पक्षाच्या नेत्यांनी अधिकृतपणे एनडीएचा नेता म्हणून निवड केली आहे. युतीचं नेतृत्त्व करण्याकरता मोदींची एकमताने निवड करण्यात आली आहे. निवडून आल्यानंतर मोदींनी कृतज्ञता व्यक्त करत म्हटलं की, मी सर्वा मित्रपक्षांचे आणि खासदारांचे आभार मानतो. ज्यांनी मला एनडीएचा नेता म्हणून एकमताने निवडले आहे.