नेवासा तालुक्यातील चांदा बर्हाणपूर सह आसपासच्या गावात शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिल्याने भीतीपोटी चांदा बर्हाणपूर सह आसपासच्या गावातील तरुणांनी खडा पहारा देत रात्र जागून काढली.
शुक्रवार रात्री आठ वाजेच्या सुमारास चांद्यातील खडकवाडी, जवाहर विद्यालय परिसर, मुळा उजवा कालवा परिसरात तीन ते चार ड्रोन फिरत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी गावात आणि परिसरातील लोकांना याबाबतची माहिती दिली. त्यामुळे गाव व वस्तीवर राहणारे सर्वजण हे ड्रोन नेमकं कशाचे आहेत? याबाबत साशंक होते. अनेक जण धास्तावले होते. गावात आणि वाडी वस्तीवरील ग्रामस्थ रस्त्यावर येऊन ड्रोनच्या घिरट्या पहात होते.
अनेकांनी याबाबत पोलीस पाटील, गावातील जाणकार नागरिक, पोलीस स्टेशन आधी ठिकाणी संपर्क करून याबाबतची माहिती घेत होते. असाच प्रकार बर्हाणपूर परिसरातही नागरिकांना पहावयास मिळाला. या ठिकाणी बर्हाणपूर गाव आणि वाडी वस्तीवर नागरिकांना तीन ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. हा प्रकार जवळपास रात्री अकरा वाजेपर्यंत चालू होता. चांदा, बर्हाणपूर सह घोडेगाव, सोनई परिसरातही ड्रोन दिसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे या भागात नेमके किती ड्रोन आहेत आणि या परिसरात ते घिरट्या का घालत आहेत? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
तालुक्यातील काही गावांमध्ये चोरीच्या घटना होत आहेत. त्यातच अचानक ड्रोन दिसू लागले. त्यामुळे नागरीक घाबरले आहेत. बर्हाणपूर परिसरातील नागरिकांनीही रात्रभर जागे राहून पहारा दिला. चांदा, बर्हाणपूर सह घोडेगाव परिसर सोनई परिसरातही अशाच प्रकारचे ड्रोन फिरत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. त्यामुळे हे ड्रोन नेमकं कुठून आले? यामागे काय उद्देश आहे? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला असून याबाबत प्रशासनाने तातडीने शोध घेऊन याचा उलगडा करावा. अशी मागणी चांदा बर्हाणपूर सह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान आकाशात फिरणार्या या ड्रोन संदर्भात सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ड्रोन आणि परिसरात होणार्या चोरीचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे नागरिकांनी ड्रोन फिरलेल्या परिसरात चोरी होते. वगैरे सारख्या अफवांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद आपणास काही वाटल्यास सोनई पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहनही सपोनी विजय माळी यांनी केले आहे.