राजस्थान, मध्य प्रदेश , छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे नेते पुढे विधानसभेत दिसतील. यानंतर आता लोकसभा गृहनिर्माण समितीनं विधानसभा निवडणूक जिंकलेल्या भाजपच्या खासदारांना नोटिस पाठवली आहे. ३० दिवसांत सरकारी निवासस्थान सोडण्याच्या सूचना नोटिशीच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. राजीनामा देणाऱ्यांपैकी ८ जण खासदार आहेत, तर ३ जण मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना शहर विकास मंत्रालयाकडून निवासस्थानं मिळाली होती. लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या खासदारांना निवासस्थानं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात राकेश सिंह, अरुण साव, गोमती साई, रिती पाठक, बाबा बालकनाथ, राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी आणि उदय प्रताप सिंह यांचा समावेश आहे.