संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना १३ डिसेंबर रोजी लोकसभेत गदारोळ झाला. प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी लोकसभेत उडी मारून कॅनमधील पिवळा धूर सोडला. यामुळे काहीकाळ कामकाज ठप्प झालं होतं. याप्रकरणी सातत्याने नवनवे खुलासे समोर येत आहेत. आरोपींची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
या प्रकरणातील ललित झा याला १५ डिसेंबर रोजी पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली. या कटाचा मीच मुख्य सुत्रधार असल्याचं ललित झा याने पोलिसांच्या चौकशीत मान्य केल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.
घटनेमागील कथित सूत्रधार ललित झा आणि त्याच्या सहआरोपींना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी देशात अराजकता निर्माण करायची होती, असं दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडे त्यांच्या रिमांड याचिकेत नमूद केले. हल्ल्यामागचा खरा हेतू, त्यांचे शत्रू देशांशी आणि दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती कोर्टात देण्यात आली.