दिल्ली पोलिसांनी संसदे सभागृहात आणि बाहेर गोंधळ घालणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. हे चारही जण वेगवेगळ्या राज्यातील आहेत. लोकसभेतून अटक करण्यात आलेले आरोपी सागर शर्मा हा लखनऊचा तर मनोरंजन हा कर्नाटकातील बेंगळुरूचा रहिवासी आहे. तर, संसदेबाहेर अटक करण्यात आलेली महिला नीलम ही हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहेत. तर, २५ वर्षीय अनमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे. हे चौघेही एकमेकांना आधीच ओळखत असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. परंतु, या कटामागे आणखी दोन जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
संसदेची सुरक्षा भंग करून संसदेच्या आवारात तसेच लोकसभा सभागृहात धूर सोडणारे हे चारही जण पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते अशी महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्याचप्रमाणे चार दिवसांपूर्वी हे चारही जण दिल्लीत आले होते आणि दिल्लीतील एका गुरुग्राममधील एका घरात राहत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे
प्रेक्षकांच्या गॅलरीत बसलेला एक तरुण आणि एक महिला उडी मारुन थेट सभागृहात वेलमध्ये आला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
घोषणाबाजी करणारा तरुण हा महाराष्ट्राचा निघाला. अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव. तो लातूरच्या झरी गावाचा रहिवासी आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अधिक माहिती मिळवण्यासाठी अमोल शिंदे यांच्या झरी गावात धडक दिली. पोलिसांनी अमोल शिंदे याच्या आई-वडिलांची चौकशी केली. यावेळी अमोल शिंदे हा पोलीस भरतीची तयारी करत होता. तो कॉलेजमध्ये शिकत होता. तसेच त्याचे आई-वडील मजुरी करुन आपला उदरनिर्वाह भागवतात, अशी माहिती समोर आली. अमोलची घरची परिस्थिती बेताची आहे. त्याला आणखी दोन मोठी भावंडं आहेत, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली.