एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात ४० मिनिटे चर्चा झाली. बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास त्याचा मराठा मतांवर काय परिणाम होईल, याचा आढावा शाहांनी घेतला असल्याची माहिती मिळत आहे. आगामी निवडणुका, फडणवीसांचा चेहरा आणि मराठा-ओबीसी मतांबाबत शाहांनी माहिती घेतली. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा असताना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील समीकरणे जाणून घेतल्याबद्दल भाजपाकडून इतर राज्यांप्रमाणेच धक्कातंत्राचा वापर केला जाणार का? यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मागच्या दोन वर्षांत भाजपाने इतर राज्यांमध्ये प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला करून नवे नेतृत्व दिले आहे. मध्य प्रदेशमध्ये त्यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या जागी डॉ. मोहन यादव, छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांच्याऐवजी विष्णू देव साय, राजस्थानमध्ये वसुधंरा राजे यांच्याऐवजी भजनलाल शर्मा आणि हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांना बाजूला सारून नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले. भाजपाने इतर राज्यात ज्याप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करून नवे नेतृत्व समोर आणले, तसाच प्रयोग महाराष्ट्रात होणार का? हे येणाऱ्या दिवसांत समजू शकेल.