चांगल्या शाळा-कॉलेजात प्रवेश घेतल्यानंतर पालक आपल्या पाल्याला चांगल्या शिक्षणाच्या आशेने खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेऊन देतात. पालकांचा ओढा जास्त वाढल्याने खासगी कोचिंग क्लासेसचालकांनीही खोटी आमिषे आणि फसव्या जाहिराती करून पालकांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आता शिक्षण मंत्रालयाने या सर्वांवर चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्रालयाने नवे मार्गदर्शक तत्वे जाहीर केले असून त्यानुसार, १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची ते नोंदणी करू शकत नाहीत. तसंच, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि चांगल्या गुणांची हमी देणं बेकायदेशीर ठरवण्यात येणार आहेत. कायदेशीर चौकटीची गरज आणि खाजगी कोचिंग केंद्रांच्या अनियंत्रित वाढीचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.
कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकत नाही. कोचिंग सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी संस्था दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत किंवा पालकांना दर्जा किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाहीत. संस्था १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही. विद्यार्थ्यांची नोंदणी ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच व्हायला हवी”, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
“कोचिंग संस्था कोचिंगच्या गुणवत्तेबद्दल किंवा दिशाभूल करणारी जाहिरात प्रकाशित करू शकत नाही किंवा त्यात भाग घेऊ शकत नाही”, असंही यात म्हटलं आहे. गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकांना कोचिंग सेंटर्स कार्यरत ठेवू शकत नाही.
मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी आकारले जाणारे शिक्षण शुल्क योग्य आणि वाजवी असेल आणि आकारलेल्या शुल्काच्या पावत्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. विद्यार्थ्याने कोर्ससाठी पूर्ण पैसे भरले असतील आणि विहित कालावधीच्या मधोमध कोर्स सोडला असेल, तर विद्यार्थ्याला उर्वरित कालावधीसाठी आधी जमा केलेल्या शुल्कापैकी १० दिवसांच्या आत प्रो-रेटा आधारावर परत केले जाईल.