शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) व भाजप यांच्यामधील बेबनाव उघड झाला आहे. शिर्डीचे शिंदे गटाचे विद्यामान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीला नेवासा भाजपने विरोध दर्शवला आहे.
महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झाले नसले तरी विद्यामान खासदार असल्याने शिर्डीची जागा शिंदे गटाकडे गेल्याचे मानले जाते. राज्यातील सत्तेत भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट) यांची महायुती आहे. मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विद्यामान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देऊ नये अशी जाहीर मागणी भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे. त्यामुळे युतीमधील बेबनाव जनतेसमोर आला आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेल्या पत्रात किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे यांनी म्हटले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुमारे ८०० गावे असून तेथे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी दुष्काळ पडलेल्या भागात खासदार फिरकले देखील नाहीत. ते भाजप तसेच शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात देखील नाहीत. फक्त ठेकेदारांसमवेत त्यांची सतत ऊठबस असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून व बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांना दोन वेळेस संसदेमध्ये पाठवलेले. मात्र गेल्या १० वर्षांत मतदारसंघात म्हणावा असा विकास झालेला नसल्याने मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
खासदार लोखंडे यांचे विरोधाकांशी साटेलोटे असून पुन्हा त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव होऊ शकतो. शिर्डी मतदारसंघात शिवसेनेला पराभव टाळायचा असेल तर कुठल्याही किमतीत लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी अंकुश काळे यांनी पत्रात केली आहे.