नगर आणि माढाबाबत करण्यात आलेलं वक्तव्य म्हणजे शिळ्या कढीला उत देण्याचा प्रकार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी अजित पवारांवर केलीय. तसेच मी आणि धैर्यशील मोहिते पाटील निवडून आलो आहे, खासदार झालोय. आता त्या गोष्टीला महत्त्व राहिले नाही, असंही खासदार निलेश लंके म्हणाले आहेत.
दक्षिण नगरमधून निलेश लंके आणि माढ्यातून मोहिते पाटलांना महायुतीतून उमेदवारी देण्यात येणार होती. पण भाजपाने आम्हाला जागा सोडल्या नाहीत, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. आता या वक्त्यव्यावरून निलेश लंके यांनी अजित पवारांवर पलटवर केलाय. ते सांगलीच्या जतमधील उमदी येथे बोलत होते. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार गटात मोठी चुरस पाहायला मिळाली होती. आता विधानसभेसाठी दोन्ही गटांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचं चित्र आहे.
अजित पवारांनी राज्यात सर्व्हे आणि ५४ जागांवर दावा केलाय. याबाबत बोलताना लंके म्हणाले की, अजित पवार हे महायुतीमधील घटक पक्षाचे नेते आहेत . त्यामध्ये त्यांनी कुठल्या जागा घ्यायच्या, तो त्यांच्या पक्षाचा आणि महायुतीचा अधिकार आहे. त्यावर आपण बोलणे योग्य नसल्याची भूमिका लंके यांनी स्पष्ट केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार असेल. जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील आमचे नेते ठरवतील, असंही खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय.