अहमदनगर : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश करण्यासाठी नीलेश लंके यांनी पारनेरच्या आमदारपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा अध्यक्षांनी तो मंजूर केला आहे. त्यामुळे पारनेरची आमदारकीची जागा आता रिक्त झाल्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे अजितदादा गटाच्या आमदारांची संख्या आता एकने घटली आहे. एवढ्यात पोट निवडणूक होण्याची शक्यता नसल्याने विधानसभेची निवडणूक होऊपर्यंत ही जागा रिक्त राहणार आहे. विधानसभेला आता पारनेरमधील राजकीय समीकरण कसे असेल, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लंके यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविली. त्यांच्या उमेदवारीच्यावेळी मोठे नाट्य घडले होते. आमदारकीचा राजीनामा न देता पक्षांतर केल्यास त्यांना अपात्र ठरविले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी या पदाचा १० एप्रिलला राजीनामा दिला आणि पवार गटातून उमेदवारी मिळविली. अर्थात हे सर्व सहा महिन्यांपूर्वीच ठरल्याचा गौप्यस्फोट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अलीकडेच केले होता. विधानसभा अध्यक्षांनी १० एप्रिललाच लंके यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासंबंधीची २४ एप्रिलची अधिसूचना नुकतीच प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये पारनेरची जागा आता रिक्त झाल्याचे म्हटले आहे.