महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी माझ्या एवढे इंग्रजीत बोलून दाखवावे, भलेही महिनाभर वेळ घेऊन पाठ करून बोलून दाखवावे, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं आव्हान अहमदनगर दक्षिण लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी दिलं होतं. या टीकेला निलेश लंके यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. सुजय विखे हे श्रीमंत कुटुंबातील आहेत, ते माझ्यासारख्या गरीब उमेदवाराची अशाच पद्धतीने टिंगल करतील, ही त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे असं प्रत्युत्तर निलेश लंके यांनी दिलं.
इंग्रजी बोलणण्यावरून सुजय विखेंनी केलेल्या टीकेला निलेश लंकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, समोरचे उमेदवाराकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे. एका बाजूला सांगायचं की जे सक्षम आहे त्यांनीच राजकारण करायचं, दुसरीकडे सांगायचं निलेश लंकेला इंग्रजी बोलता येत नाही. पण मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो आहे. त्यामुळे मी इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकलो नाही.
निलेश लंके यांनी सुजय विखेंना प्रत्युत्तर देत अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक ही गरीब विरुद्ध श्रीमंत अशी असल्याचं म्हटलं. सोबतच तुम्ही वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यापेक्षा पाच वर्षात काय काम केलं यावर बोला असं आव्हान निलेश लंकेंनी दिलं आहे.