अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. मात्र जगन्नाथपुरीच्या गोवर्धन मठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती () आणि उत्तराखंडच्या ज्योतिर मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. चारही शंकराचार्यांच्या निर्णयाचा अर्थ मोदीविरोधी असला लावण्यात येऊ नये, मात्र आम्ही धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊ इच्छित नाही, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले. त्यांचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.
कोणत्याही तिरस्कारामुळे किंवा द्वेषामुळे हा निर्णय घेतलेला नाही. मात्र शास्त्रविधींचे पालन करणे आणि त्याचे पालन केले जाईल याची खात्री करणे हे शंकराचार्यांचे कर्तव्य आहे. मात्र इथे शास्त्रविधींकडे दुर्लक्ष होत आहे. मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेला नाही. अशा निर्माणाधीन मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे ही सर्वात मोठी समस्या आहे, धर्मशास्त्र याला अनुमती देत नाही, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
याआधी जगन्नाथपुरीच्या गोवर्धन मठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी राममंदिराच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्यास नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घाटन करून त्या मूर्तीला स्पर्श करतील. मग मी त्या ठिकाणी काय फक्त टाळ्या वाजवायला जाऊ का? असा सवाल त्यांनी केला.