रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते.. हा अनुभव सर्वसामान्यांना रोजचाच. याच खड्ड्यांच्या रस्त्यामुळे अपघातात अनेकांचा जीव जातो. मात्र पुण्यातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनाही मोठा फटका बसलाय. मुर्मूना पुणे दौऱ्या खड्ड्यांचा मोठा त्रास झाला.
त्यामुळे राष्ट्रपती भवनानं पुणे महापालिकेला पत्र लिहून नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे पालिकेची लक्तरं वेशीला टांगली गेली आहेत. हे कमी होतं की काय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी पुण्यातल्या जाहीर कार्यक्रमात मुंबई-पुणे, नगर-कल्याण रस्त्यावरून राज्य सरकारचे चांगलेच वाभाडे काढलेत.
या रस्त्यांवर टोल वसुली राज्य सरकारची आणि शिव्या मी खातो, असं म्हणत गडकरींनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केलाय. एवढंच नव्हे तर रस्ते दुरूस्त केले नाहीत तर रस्ते ताब्यात घेईन, अशी तंबीच त्यांनी राज्य सरकारला दिलीय.आता 26 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर येणार असल्याने पुणे पोलिसांनी शहरातील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेला पत्र लिहीलंय. तर गडकरींनीही महायुती सरकारला इशारा दिलाय. त्यामुळे राज्य सरकार रस्त्यांवरचे खड्डे बुजवणार की गडकरींवर रस्ते ताब्यात घेण्याची नामुष्की ओढावणार? याची उत्सुकता आहे.