Wednesday, April 30, 2025

नितीन गडकरी म्हणतात… सध्या कोण कुठल्या पक्षात…राजकारणात संधीसाधू…

महाराष्ट्रात सध्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमधील फुटीची जोरदार चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी चालू असून १० जानेवारीपर्यंत शिवसेना फुटीवर त्यांचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीबाबतचाही निकाल येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आमदार-खासदार असे लोकप्रतिनिधी सर्रासपणे पक्षबदल करण्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात आहे. यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी परखड भाष्य केलं आहे.
पार्ले येथील लोकमान्य सेवा संघातर्फे ‘लोकमान्य गप्पा’ हा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी सध्याच्या राजकीय स्थितीविषयी बोलताना पक्षबदल वा भूमिकाबदल करणाऱ्या लोकप्रतिनिधी व नेतेमंडळींना कानपिचक्या दिल्या.
“प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार आपल्या शाळांमधून, गुरुंकडून जे संस्कार मिळतात, त्यातून माणसाला जीवन दृष्टीकोन प्राप्त होतो. आज दुर्दैवाने ना उजवे, ना डावे, आपण संधीसाधू हेच राजकारणातलं सूत्र आहे. कोण कुठल्या पक्षात कधी घुसतात, कधी बाहेर जातात, कुठे जातात हे कुणीच सांगू शकत नाही”, असं नितीन गडकरी म्हणाले.

राजकीय पक्ष व विचारांचा संबंध नसतो, अशी मिश्किल टिप्पणीही गडकरींनी यावेळी केली. “राजकीय पक्षाचा आणि विचारांचा काय संबंध? राजकीय पक्षांचा संबंध निवडणूक जिंकण्याशी असतो. बाकी त्या दृष्टीने ते विचार करतात. देशात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही सगळ्याच क्षेत्रातली समस्या आहे”, असं गडकरी म्हणाले. “जोपर्यंत जनता जात-पंथ-धर्म-भाषा आणि लिंगाच्या आधारावर मतदान करेल, तोपर्यंत नेतेही तसेच येतील. जेव्हा जनता जागृत होईल, या सगळ्या गोष्टींना महत्व देईल आणि निवडणुकीत विचार करून मतदान करेल तर आपोआप परिवर्तन होईल”, असंही गडकरींनी नमूद केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles