शिक्षक मतदार संघ;
शिक्षक मतदार संघात 38 पैकी 2 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध
नाशिक, दि.10 जून,2024
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 ची नामनिर्देशनपत्रांच्या छाननीची प्रक्रिया शांततेत पार पडली. 31 मे, 2024 ते 7 जून,2024 या कालावधीत 38 उमेदवारांनी 53 नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते. त्यापैकी 36 उमेदवारांचे अर्ज वैध व दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.
अमोल बाळासाहेब दराडे आणि सारांश महेंद्र भावसार यांचे वय 30 वर्षापेक्षा कमी वय असल्याने त्यांची नामनिर्देशनपत्रे ” अवैध” ठरले आहेत. दराडे किशोर भिकाजी यांच्या शपथपत्राबाबत उमेदवार बोठे रणजित नानासाहेब यांचे प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता, तो कायदेशीर तरतुदीनुसार फेटाळण्यात आला, व श्री दराडे किशोर यांचे नामनिर्देशन पत्र “वैध ठरविण्यात आले.
36 उमेदवार वैधरित्या नामनिर्दिष्ट झालेले आहेत. ज्या उमेदवारांना माघार घ्यावयाची असेल ते दि.12 जून,2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत उमेदवार माघार घेऊ शकतील.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुषंगाने नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून विक्रम कुमार, भा.प्र.से. यांची नियुक्ती निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. संपर्कासाठी विक्रम कुमार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9822462523 व दूरध्वनी क्रमांक 0253, 2990821 असा आहे