इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने नुकतंच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नॉन-स्टिक भांड्यांच्या वापराविषयी सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.
त्याऐवजी आयसीएमआरने लोकांना इको-फ्रेंडली भांडी वापरण्याचा सल्ला दिला आहे. इको-फ्रेंडली भांड्यांमध्ये मातीची भांडी आणि कोटिंग नसलेली ग्रॅनाइट दगडाच्या भांड्यांचा समावेश आहे.
नॉन-स्टिक वापरण्यास सुरक्षित आहेत, पण त्यावर एखादा चरा पडल्यास त्यात शिजवल्या जाणार्या पदार्थातून घातक रसायन शरीरात जाऊ शकते. टेफ्लॉन भांड्यांमध्ये चरा पडल्यास आणि त्यातील अन्न १७० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात शिजवल्यावर जास्त प्रमाणात विषारी धुके आणि हानिकारक रसायने अन्नामध्ये जाऊ शकतात, असे आयसीएमआर म्हणते. हे हानिकारक रसायन फुफ्फुसावर घातक परिणाम करू शकते. यामुळे पॉलिमर फ्यूम फिव्हर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लूसारखी लक्षणे उद्भवू शकतात. २०२२ मध्ये ‘सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्नमेंट’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ऑस्ट्रेलियन अभ्यासात असे दिसून आले आहे की, टेफ्लॉनची भांडी ९,१०० मायक्रोप्लास्टिक कण अन्नात सोडू शकते.