अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामाकरण झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या मागणीला जोर चढला. गेल्या वर्षी चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. त्यांनी जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नाव देण्याची घोषणा केली होती.
अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अगोदरच केंद्र सरकारकडे पाठवला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली.