पुणे : मुंबईचा फौजदार, देऊळ बंद, पानीपत आदी सिनेमातील अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते, देखणा आणि रुबाबदार नट, रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षाचे होते. तळेगाव दाभाडे येथील बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वाने मराठी सिनेसृष्टी गाजवणारा कलावंत गमावल्याची भावना मराठी सिनेसृष्टीतून व्यक्त होत आहे.
रवींद्र महाजनी यांना गेल्या काही दिवसांपासून दम्याचा त्रास जाणवत होता. मावळमधील वातावरण मानवल्यामुळे ते गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मावळमध्ये राहायला आले होते. तळेगांव एमआयडीसी परिसरातील आंबी गावात असलेल्या एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ते भाड्याने राहत होते. फ्लॅटमध्ये ते एकटेच राहत होते. त्यांच्या फ्लॅटमधून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दुर्गंधी येऊ लागल्याने सोसायटीतील नागरिकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी येऊन फ्लॅट उघडण्याचा प्रयत्न केला. पण आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने अखेर फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलीस आत गेले.
प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृत्यू; बंद खोलीत आढळला मृतदेह
- Advertisement -