नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या २९१ कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतलेला अधिकारी राजेंद्र केशव डोळे (रा. सातारा) याला रात्री उशिरा चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कुवत नसताना कर्जाची शिफारस करणे, कर्जाची कागदपत्रे स्वतःच तयार करणे, यासह डोळे याच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालानुसार पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरू आहे. काही संचालक व अधिकारी, कर्जदारांना अटकही करण्यात आली आहे. तसेच, इतर काही अधिकार्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यात डोळे यांच्यावर संशय आल्याने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले होती. डोळे हे बँकेच्या मुख्यालयात कर्ज छाननी समितीत अधिकारी होते. चौकशीनंतर रात्री त्याला अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी दुपारी तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती यांनी न्यायालयासमोर हजर केले. सरकार पक्षाच्या वतीने ड. मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली.
राजेंद्र केशव डोळे हा बँकेत कर्ज अर्ज छाननी विभागाचा सहायक प्रमुख व्यवस्थापक पदावर काम करत असताना अपहाराशी संबंधित पुष्कराज ट्रेडींग, एस. एस. साई डेव्हलपर्स, मे. तुकाराम एखंडे, सुरेश इंडस्ट्रीज, स्वप्नील इंडस्ट्रीज, के. के. विदयुत, श्री गणेश एजन्सी, नयन एंटरप्रायजेस, यशराज वास्तू, नागेश प्रॉपर्टीज व इतर या कर्जदारांची कुवत नसताना, पुरेसे तारण नसताना त्यांच्या कर्जप्रकरणांना शिफारस दिल्याचे तपासात समोर आले आहे.
तसेच, घोटाळ्यातील आरोपी शितल शिवदास गायकवाड हिच्या जिजाई मिल्क प्रोडट या फर्मच्या नावे नगर अर्बन बँकेतून बिगर सहीचे व वाढीव मूल्यांकन असलेले बनावट व्हॅल्युएशन रिपोर्टच्या आधारे ८ कोटी ५० लाख रुपये कर्ज वितरीत झालेले आहे. या कर्जप्रकरणाची सर्व कागदपत्रे राजेंद्र डोळे याने मुख्य कार्यालयात तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कर्जखात्यावर १५.१३ कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती.